नांदेड / देगलूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीकडून जय्यत तयारी चालू आहे. सध्या स्थानिक नेत्यांच्या हालचालीचा वेग वाढला असून यंदा तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असतील तर इतर पक्षांची भूमिकाही निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
देगलूर शहर तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या त्रिसीमेवर वसलेले असून नांदेड शहरानंतर महत्वाचे म्हणून शहर म्हणून देगलूरची ओळख आहे. नुकतेच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने स्थानिक नेत्यांकडून निवडणूकच्या परिक्षेचे अभ्यास आणि व्यूहरचना आखली जात आहे.
सध्या राजकीय हालचालींना चांगलेच वेग आले असून हेवेदावे, गटबाजी, पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोप हे देगलूरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. राजकीय वर्तुळात दिवसेंदिवस बदल होत असले तरी यंदाची निवडणूक मात्र चुरशीची होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे पक्ष आघाडीवर आहेत. परंतु शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), वंचित बहुजन आघाडी, ए.आय.एम.आय.एम आणि विविध सामाजिक संघटना यांची भूमिकाही तेवढीच निर्णायक ठरणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मनोरमा मष्णाजी निलमवार यांचे नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाकडून विजयमाला बालाजी टेकाळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
सध्या भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्यात आलेला नसला तरी देगलूर येथील मोंढा मैदानावर दि. ०३ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या जनसंवाद सभेत प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपाच्या सर्वेक्षणात आघाडीवर असणाऱ्या उमेदवाराच्याच गळ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची माळ पडणार हे मात्र निश्चित!
प्रशासकीय आकडेवारीनुसार देगलूर शहरात 22782 पुरुष मतदार तर 22465 महिला मतदार आहेत. तब्बल 45247 मतदार आगामी निवडणुकीत सत्तावीस लोकप्रतिनिधींच्या जागेचे भविष्य ठरवणार आहेत. त्यामुळे तुर्तास तरी मतदारांचे भाव वधारले आहे. परंतु सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतराचे सत्र चालूच आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारराजा कोणावर दिलदार होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शहरातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, महिलांच्या सक्षमीकरणाची मुद्दा, शैक्षणिक संकुलाची उभारणी, नाली, रस्ते,पाणी, वीजपुरवठा आणि गटार योजना यासारखे मूलभूत प्रश्न कोणत्या पक्षाचा अजेंडा असणार आहे. मागील काळात त्या-त्या पक्षांची आणि प्रतिनिधीची भूमिका काय राहीली आहे याचाही विचार मतदारराजा करणार असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे आतातरी राजकीय भाकित करणे अवघड आहे मात्र ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे.
मागील काळात काँग्रेसची सत्ता नगरपरिषदेवर होती. त्यामुळे सत्तेतील कामगिरीचा आलेख माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि त्यांच्या शिलेदारांकडून जनतेसमोर ठेवले जाईल. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून लक्ष्मीकांत पदमवार हे राष्ट्रवादीच्या रथाचा सारथी म्हणून भूमिका कशी वटवणार ? यावरही भवितव्य ठरवणार आहे. तसेच देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही सत्ता प्रस्थापनेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल.
सध्या देगलूर – बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या माध्यमातून सत्तेची समीकरणे कशी आखली जातील, भाजपातील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांचे सूर जुळविण्यावरही विजयाची गणित ठरणार आहे. राज्यसभेचे खा. अशोक चव्हाण आणि खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाची परीक्षा असणार आहे. तसेच संघाच्या तत्वप्रणालीचा अवलंब करीत निवडणूक लढविल्यास नगरपरिषदेवर कमळ फुलण्यासाठी शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विविध घटकांची गोळाबेरीज करीत राजकीय समीकरणे जुळवणाऱ्यांवर आघाडीच्या पक्षाकडून भर दिला जाईल.
त्याचबरोबर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षात बालाजी पाटील खतगावकर यांच्यामार्फत राजकीय हालचाली होत आहेत, परंतु त्या कितपत यशस्वी ठरतील हे सांगणे कठीण आहे. तर शिवसेना (उबाठा गट) हे पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्यास काँग्रेस पक्षाला बळ मिळेल पण मुस्लिम समाजाची नाराजी भोवल्यास विजयाची वाटचाल खडतर होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत ए.आय.एम.आय.एम नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने आजतागायत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
स्थानिक नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच या सर्व घडामोडींचा विचार केल्यास तिरंगी लढत होईल परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इतर पक्षांचे व संघटनांचे मनोमिलन झाल्यास चौथी आघाडी सुद्धा निर्माण होऊ शकेल. असे घडल्यास आश्चर्याचे कारण नाही.




















