पोलीस वाहनाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक
चालक पोलीस कर्मचारी जखमी ; एकाविरोधात गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी):-
कोपटे वस्ती ता. सांगोला येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस गेले असता, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पोलीस गाडीला धडक दिली असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी चालक पो.कॉ. तेजस शशिकांत मोरे (ने. मंगळवेढा पोलीस ठाणे सध्या सांगोला पोलीस ठाणे येथे महामार्ग गस्त ) यांनी सांगोला पोलीसात सचिन महादेव नायकुडे रा. जवळा ता. सांगोला याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ जून रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास डायल ११२ नंबरवर कोपटे वस्ती सांगोला येथे अवैद्य वाळू उपसा चालू असल्याचा कॉल आला.
सदर ठिकाणी फिर्यादी चालक पो.कॉ. तेजस मोरे, वाघमोडे व साबळे असे सरकारी वाहन ( MH-13 BQ- 0158 ) ने सांगोला ते कोपटे वस्ती येथे जात असताना चालक सचिन नायकुडे याने त्याच्या ताब्यातील चोरीच्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर जुना दहीवडी रस्त्याकडून कोपटे वस्तीकडे येणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगात जाताना, पोलीसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने ट्रॅक्टर न थांबवता सरकारी वाहनास जोराची धडक दिली. यावेळी ट्रॅक्टर चालकाने पोलीसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या अपघातात फिर्यादी हे जखमी असून सरकारी वाहनाचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केले असून पोलीसांनी ट्रॅक्टर व वाळू असा सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.