नांदेड – माहूर तालुक्यातील भगवती येथील नागरिकांवर तब्बल दहा वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मरणयातना भोगण्याची गंभीर वेळ आली असून , राष्ट्रीय महामार्गावरील सारखणी या जंक्शन पॉईंट पासून भगवतीला जाणारा अंतर्गत रस्ता हा यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सध्या आणखीनच खराब झाला असून, रस्त्यावर गुडघाभर पाणी व चिखल साचून रस्त्याला चक्क दलदलीचे रुप आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे सुद्धा कठीण झाले असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती बांधकाम विभागाने हा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे (एशिं) युवा नेते पिंटू पाटील वायफणीकर यांनी भगवती येथील नागरिकांसह चक्क शालेय विद्यार्थ्यांसह रस्त्यावर बेशरमाचे झाडं लावून अनोखे आंदोलन करत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेने गंभीर रूप धारण करून यावर्षीच्या अतिवृष्टीच्यापार्श्वभूमीवर प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील सारखणी येथून भगवतीला जाण्यासाठी जवळपास दहा वर्षांपासून वाहन तर सोडा नागरिकांना चालण्यायोग्य देखील रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. खराब रस्त्यामुळे
दररोज अपघात होत असून दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे, भेगा आणि खराब ड्रेनेज यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामुळे वाहन चालवणे धोकादायक होत असून. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात पोहोचवणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे आणि रुग्णांना आरोग्य सेवा मिळवणे कठीण झाले आहे.
रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे आणि भेगांमुळे प्रवास धोकादायक झाला असून,वाहनांचे नुकसान होत आहे.खराब ड्रेनेजमुळे पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरून जात आहे आणि पाणी साचत आहे.तर सदरील रस्ता हा उन्हाळ्यात कोरडा आणि धुळीने भरलेला राहत असल्याने प्रदूषण वाढत आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
खराब रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनांचे टायर आणि सस्पेंशन खराब होत आहेत.त्यामुळे वाहनधारकांना दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.खराब रस्त्यांमुळे प्रवासाला जास्त वेळ लागत असून वेळोवेळी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या त्यामुळे सदरील सारखणी ते भगवती या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी अधिक निधीची आवश्यकता असून,या ठिकाणी केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान ग्रामसडक योजना’ आणि राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ यांसारख्या योजनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक झाले आहे.
चांगले मजबूत रस्ते बांधणीच्या आणि दुरुस्तीच्या कामामध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.सदरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे व संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रस्ता तातडीने दुरुस्ती करून द्यावा यासाठी आज भगवती गावचे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते.शिंदे सेनेचे युवा नेते पिंटू पाटील वायफनीकर यांनी सदरील रस्ता हा तातडीने दुरुस्ती करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिती बांधकाम विभागाला केली असून ,रस्त्याला तात्काळ दुरुस्त करत रस्ता चालणे योग्य बनवावा अशी मागणी भगवती वायफनी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.




















