सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लिमयेवाडीतील एकमल्ले चौक येथे भीम ज्योत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एक्कमले, अभिजीत फडतरे, राहुल एक्कमले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे व विराज जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी शिवराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले की, यापूर्वीही प्रभाग २२ मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे केली आहेत.
मात्र विरोधक त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असून मतदारांची दिशाभूल करत आहेत. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदारही भाजपाचे असल्याने प्रभाग २२ च्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. विकासासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही; पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीने भाजपा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल भानावत व चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपाच्या चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. भाजपाला मत म्हणजे विकासाला मत. आता प्रभाग २२ चा विकास थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. मतदारांनी विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या पाठीशी खंबीर उभे राहावे, असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले.


















