माढा लोकसभा मतदारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळणार हे समजताच पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिले. या मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. त्यांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू अभयसिंह जगताप हे शरदचंद्र पवार गटाकडून माढा लढविण्यासाठी इच्छुक होते. काही महिन्यांपासून त्यांनी या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपला संवाद दौराही सुरू ठेवला होता. परंतु तिकिट मोहिते पाटील यांना मिळत असल्याचे समजताच ते नाराज झाले.