बार्शी – यशोदा शिक्षण प्रसार मंडळ संचलित सोजर इंग्लिश स्कूल, माध्यमिक विभागाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक विभागाकडून दिवाळी निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
५ ते ७ या गटातून ‘आकाश कंदील बनवणे’ ही स्पर्धा घेण्यात आली. तर ८ वी ते १० वी या गटातून मुलांसाठी ‘किल्ले बनवणे’ व मुलींसाठी “तबक सजावट” या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तबक सजावट या स्पर्धेत विद्यार्थीनींनी कलात्मक आविष्काराचे सादरीकरण केले. ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाशकंदील बनवून दिवाळीआधीच दिवाळी साजरी करुन स्पर्धेचा आनंद घेतला.
आकाशकंदील बनवणे या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामधून शांभवी पालके, सई नाईकनवरे व आयमन नाईकवाडी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तबक सजावट या स्पर्धेत नेहमीच आपल्या आगळावेगळा कलाविष्कार साकारणारी विद्यार्थीनी असिन तांबोळी हिने प्रथम तर श्रुती पडवळ द्वितीय व प्रांजल वाघमारे हिने तृतीय क्रमांक पटकावला. किल्ले बनवणे या स्पर्धेत शिवाजी महाराजांच्या स्मृतींना मानवंदना देत विद्यार्थ्यांनी यावर्षी जागतिक मानांकन मिळालेले खांदेरी, सुवर्णदुर्ग, साल्हेर, लोहगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्साहाने व सहभागाने ही स्पर्धा रंगतदार झाली.
‘किल्ले बनवणे’ स्पर्धेत खांदेरी गड प्रथम, सुवर्णदुर्ग द्वितीय तर साल्हेर किल्ला तृतीय असे क्रमांक जाहीर झाले.
या तीनही स्पर्धांचे परीक्षण प्रशालेचे मुख्याध्यापक संदीप पोळ, सांस्कृतिक विभाग समन्वयक शिक्षिका अर्चना शिंदे व लिपिक भगवंत बडवे यांनी केले. स्पर्धेचा निकाल अर्चना शिंदे यांनी जाहीर केला.
गेल्या १७ वर्षांची किल्ल्यांची परंपरा अविरत ठेवणे हे शाळेसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. मुख्याध्यापक पोळ सरांच्या हस्ते स्पर्धेतील मुलांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी संगीत शिक्षक प्रसाद सहस्रबुद्धे यांनी “गेला दसरा आली दिवाळी” हे गीत सादर केले. तदनंतर फटाक्यांच्या आतीषबाजीने तसेच दिवाळी फराळाचे वाटप करुन आणि शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

















