सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनात झालेल्या कॅट शोमध्ये मांजर प्रेमींच्या उत्साहाचे दर्शन घडले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही कॅट शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रे निमित्त श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने होम मैदान येथे 25 डिसेंबर पासून सुरू असलेल्या श्री सिध्देश्वर कृषीव औद्योगिक प्रदर्शनात रविवारी आयोजित कॅट शोने सर्वांची मने जिंकली.प्रदर्शनातील चौथा दिवस रविवार असल्याने नागरीकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. मुख्य सभा मंडपात सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चाललेल्या कॅट शोमध्ये सुमारे 70 मांजरांनी सहभाग नोंदविला. यावेळी फॅन्सी – फॅशन कॅट शो या स्पर्धाही घेण्यात आल्या. या फॅशन शोमध्ये कॅटच्या मालकांच्या कल्पकतेची अनोखी झलक पाहण्यास मिळाली. उपस्थितांनी फॅशन शोला मोठा प्रतिसाद दिला.सर्वच वयोगटातील स्त्री पुरूषांनी उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दिसून आले. कॅट शोमधील विजेत्यांना कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरूराज माळगे, विश्वस्त पशुपतीनाथ माशाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कॅट शो शोमध्ये सहभागी या सर्व मांजरांची शरीराची ठेवण, डोळे, दात, उंची, केस, रंग, शेपटी, पायांची ठेवण, स्वच्छता आणि केंसांची निगा या सर्व बाबींची परीक्षकांकडून तपासणी करण्यात आली.
या स्पर्धेसाठी पेट्स वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे आर्यन दळवी,आणि महेश दळवी यांच्यासह संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वप्ना दळवी, शलवारी श्राफ, सोहेल शेख आणि शादाब कांबळे यांनी काम पाहिले.
प्रदर्शनात हे ठरले विजेते
अजिज कांबळे यांच्या बंगाल टायगर कॅटने या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. सोहेल शेख यांच्या एक्सट्रीम पंच पर्सियन प्रजातीच्या कॅटने दुसरे तर अरबाज शेख यांच्या पर्सियन प्रजातीच्या कॅटने तिसरे क्रमांक पटकाविले. या सोबतच सादीया शेख आणि जुनैद यांच्या मांजरांनीही अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकाविला. यावेळी फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या मांजरांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

























