सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साई चरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्या वतीने साई चरणी भरभरून दान करण्यात आले असून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साई चरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टीत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाचं दि. २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक १ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
हुलवळे म्हणाले की, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त दिनांक २३ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या काळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून ७,८०,४४,२६५ रुपये, देणगी काउंटरव्दारे ३,५३,८८,४७६ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑडरव्दारे ४,२१,४०,८९३ रुपये अशी एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (रुपये ३२,४५,२९५) व चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (रुपये ०७,६७,३४६) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून एकूण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
तसेच या कालावधीत साईप्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११,१०,६०० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्त झालेले आहे. याबरोबरच ७,४६,४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
असा होतो दानाचा विनियोग
साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरता करण्यात येत असल्याचं हुलवळे यांनी सांगितले.