सोलापूर: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे परिवर्तनशील धोरण आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण अधिक लवचिक, बहुविषयक आणि कौशल्याधारित होणार असल्याने यातून बी. कॉम. अभ्यासक्रमात नवे पर्व सुरु होईल असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने ‘एनईपी २०२० अनुषंगाने बी. कॉम. अभ्यासक्रमाची पुनर्रचना’ या विषयावर आयोजित एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते. व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. देवराव मुंडे, डॉ. इंदुमती गंगन्नवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्र-कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, वाणिज्य शिक्षणात केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर न देता, उद्योग, बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन, उद्योजकता आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांशी निगडित कौशल्यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.
बीज भाषणात डॉ. शिवाजी शिंदे यांनी एनईपी २०२० अंतर्गत बी. कॉम. अभ्यासक्रमात होणाऱ्या बदलांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी क्रेडिट प्रणाली, मल्टी-एंट्री व मल्टी-एग्झिट, कौशल्याधारित अभ्यासक्रम, मूल्यवर्धित कोर्सेस आणि संशोधनाभिमुख शिक्षण या बाबींवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. बी. कॉम. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना विद्यार्थ्यांच्या करिअरकेंद्रित गरजा लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि कौशल्यविकास अभ्यासक्रमांचा समावेश केल्यास विद्यार्थी अधिक रोजगारक्षम बनतील असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यशाळेच्या विविध सत्रांत डॉ. अमोल बोबडे, डॉ. श्रीकांत दुधाळ, डॉ. सुनील पाटील, डॉ. शिवानंद भांजे, डॉ. जैनौद्दिन मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रायोजकत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने सखोल चर्चा करून वाणिज्य शिक्षण अधिक कौशल्याधारित व रोजगाराभिमुख करण्याचा निर्धार केला.
प्रास्ताविक डॉ. इंदुमती गंगन्नवर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मृदुला मोहोळकर यांनी केले. तर आभार डॉ. देवराव मुंडे यांनी मानले.
*चौकटीतील मजकूर*
*‘वन डिग्री – मल्टिपल स्किल्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे*
बदलत्या काळानुसार येणारे आव्हानांवर मात करून जागतिक पातळीवरील स्पर्धेत उभे राहण्यासाठी विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमता, डिजिटल कौशल्ये, उद्योजकता, वित्तीय साक्षरता यांसारख्या बहुविध कौशल्यात निपुण असायला हवा. त्यामुळे महाविद्यालयांनी उद्योग, बँका आणि व्यावसायिक संस्थांशी समन्वय साधून ‘वन डिग्री – मल्टिपल स्किल्स’ ही संकल्पना प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनात आणावी असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.
*फोटो ओळ: कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. इंदुमती गंगन्नवर*



























