हदगाव / नांदेड – हदगाव तालुक्यातील वारकवाडी, वानवाडी व मांडवा परिसरात बौद्ध धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र तसेच जागतिक दर्जाचे उर्गन संघरक्षित ध्यान भावना केंद्र स्थित आहे. या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा स्थळालगत असलेल्या डोंगरांमध्ये एका खाजगी कंपनीच्या ठेकेदारा मार्फत अवैधरित्या महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिवसें- रात्र उत्खनन चालू असून परवानगी पेक्षा अधिक प्रमाणात मुरूम उत्खनन करण्यात येत असून यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी आ. कोहळीकर यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली.
यामुळे महसूल प्रशासनाचे पितळ मात्र उघडे पडले आहेत. विकासाच्या नावाखाली हदगाव तालुक्यातील नैसर्गिक डोंगर उध्वस्त करण्यासाठी कंत्राटदारांची भूमाफिया संघ तयार झाले असून महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून डोंगर पोखरण्याचे काम कंत्राटदारांकडून हे भूमाफिया यांच्यामार्फत दिवसान रात्र चालू आहेत.
आ. कोहळीकर पुढे म्हणाले की, या गंभीर विषयांवरती स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या सर्व गंभीर परिस्थितीची दखल घेत आ.कोहळीकर यांनी या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधत अवैध उत्खननाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
बौद्ध धम्माचे जागतिक तीर्थस्थळ असलेल्या क्षेत्राचे संरक्षण व्हावे तसेच पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी केली.


















