दिल्ली मद्य धोरणा घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. या कारवाईच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी सौरभ भारद्वाज, आतिश मार्लेना या 3 मंत्र्यांसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
केजरीवाल यांच्या अटकेविरोधात पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीत सकाळपासूनच निदर्शने करत आहेत. अरविंद केजरीवाल यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. आयटीओ येथे आंदोलन करणाऱ्या आतिशी मार्लेना यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आतिशी यांच्याशिवाय सौरभ भारद्वाज, गोपाल राय आणि कुलदीप कुमार या पक्षाच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एकूणच, दिल्ली सरकारचे तीन प्रमुख मंत्री आतिशी, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या सर्व लोकांना बसमधून उत्तर दिल्लीला नेण्यात आले. यावेळी आतिशि मार्लेना म्हणाल्या की, हे लोक आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात अटक करतात, त्यानंतर शांततापूर्ण आंदोलकांनाही अटक केली जात आहे. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे ? असा सवाल मार्लेना यांनी उपस्थित केला.