कुर्डुवाडी – येथील आदर्श सैनिक स्कूलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य, सुसज्ज व आधुनिक शैक्षणिक इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिनांक 5 फेब्रुवारी 2026, गुरुवार रोजी आयोजित हा सोहळा शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन *पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे व पद्मश्री डॉ. मंदाकिनी आमटे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षण, समाजसेवा व मानवतेसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना लाभावी, या हेतूने त्यांना या सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून *डॉ. सोमनाथ रोडे* यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन *संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल सुरवसे व व्यवस्थापकीय संचालिका सौ. पूजा सुरवसे* यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली करण्यात आले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे अनेकांनी नमूद केले. आधुनिक सुविधा, प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या, सुरक्षित परिसर, स्वच्छता, शैक्षणिक साधनसामग्री आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असे वातावरण या नव्या इमारतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित रेखाटणे करून भेट स्वरूप दिले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त, देशभक्ती आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास शाळेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या नव्या उपक्रमामुळे परिसरातील शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याची भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली. आदर्श सैनिक स्कूलने शिक्षण क्षेत्रात उंचावलेले हे पाऊल निश्चितच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

























