सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पावन अक्षता सोहळ्यानंतर जयोस्तुते फाउंडेशनच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भव्य व शिस्तबद्ध स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संमती कट्टा, होम कट्टा व परिसरातील रस्त्यांवर भाविकांकडून पडलेले पाण्याच्या बाटल्या, कागदांचे तुकडे व इतर कचरा तत्काळ गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
अक्षता सोहळ्यानंतर उरलेला तांदूळ वेगळा करून तो पक्ष्यांच्या खाद्यासाठी बाजूला ठेवण्यात आला, तर उर्वरित सर्व कचरा महापालिकेच्या स्वच्छता वाहनात जमा करण्यात आला. अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर पूर्ववत स्वच्छ झाल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी, मंदिर प्रशासन व भाविकांनी समाधान व्यक्त करत जयोस्तुते फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
या स्वच्छता अभियानात नीलमनगर, कलावतीनगर, माशाळेनगर परिसरातील सुमारे ८० तरुण-तरुणींनी तसेच विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेनंतर सर्व सहभागी तरुण-तरुणींना श्री शांतय्या स्वामी यांच्या हस्ते उसाचा रस देऊन तृप्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे धार्मिक कार्यक्रमांनंतर स्वच्छता राखण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याचे सदर कार्याबाबत श्री सिद्धेश्वर भक्त मंडळींनीही समाधान व्यक्त केले.
या स्वच्छता अभियानासाठी जयोस्तुते फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, पर्यावरण संरक्षण गतिविधी, समृद्धी सेवा संस्था, जय हिंद तरुण मंडळ आदी सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले. भविष्यातही असेच समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

















