माहूर / नांदेड – नांदेड जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दलीत कुटुंबातील दोन सख्ख्या जावांचे अंगावरील दागिने लुटून,गळा आवळून खून केल्याचे धक्कादायक हत्याकांड प्रकरण २० नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दोन आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व स्थानिक पोलीसांच्या मदतीने काही तासातच अटक केली. परंतु आता या प्रकरणात आणखी एक नविनच ट्विस्ट निर्माण झाले असून,या प्रकरणात
गुन्ह्यात वाढ करून ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवावीत व खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मयत मातांच्या दोन्ही मुलांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाचुंदा दुहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून काही तासातच दोन्ही आरोपीना अटक केली असल्यामुळे दोन्हीही मयताच्या मुलांनी “ऑपरेशन फ्लॅश आउट”राबवून गुन्हेगांना हतबल करणाऱ्या पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड
आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.मारेकऱ्यांवर शेतात कापूस वेचणी करत असलेल्या दोन दलीत महिला ज्या आपसात सख्ख्या जावा होत्या त्यांच्या अंगावरील जबरीने दागिने लूटने आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत ह्या दोघी सख्या जावा असून दलित प्रवर्गातील असल्यामुळे व मारेकरी जवळच्या गावातील असल्यामुळे,घटनेच्या साधारणपणे महिनाभरा आधीपासून त्या भागात फिरत असल्याचे दुसऱ्या एका प्रकरणात या प्रकरणाच्या काही दिवस आधी पानोळा येथील एका महिलेस मारहाण करून जबरी दागीने लुटून नेल्याच्या घटनेवरून उघड झाले असून, महत्वाचे म्हणजे शेतात पंचशील ध्वज बांधलेला असल्याने आरोपीना मयताची जात माहित होती. त्यामुळे या गुन्ह्यात वाढ करून ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवावीत व खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी मयत मातांच्या दोन्ही मुलांनी केली आहे.
अर्जदार मुले नामे नागेंद्र साहेबराव आढागळे व प्रमोद अशोक आढागळे हे २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांना निवेदन देण्यासाठी नांदेड येथे गेले होते. विशेष म्हणजे या संदर्भात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुका अध्यक्षा सौ.नम्रता मनोज किर्तने यांनीही उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना भेटून मागणी केली होती.
पीडित मुलांसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम, राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.) पक्षाचे विधानसभा सरचिटणीस मनोज किर्तने, कॉ.प्रसराम पारडे, किरण आडागळे सोबत होते.
मुळचे माहूरचे रहिवासी असलेले माकप जिल्हा सचिव मंडळ सदस्य तथा नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनातील मागण्या संदर्भात माहिती दिली असून, माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे माहूर यांना याविषयीची माहिती देऊन गुन्ह्यात वाढ करण्यात यावी अशी विनंती केली.
तेव्हा पोलीस अधीक्षकानी या बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकारी यांना देणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्या कॉ.उज्वला पडलवार, तालुका कमिटी सभासद कॉ.जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, मजदूर युनियन सभासद कॉ. मंगेश वटेवाड, कॉ.बालाजी पाटील भोसले, कॉ.सोनाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.
एकंदरीतच पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासक बोलण्यातून लवकरच गुन्ह्यात वाढ होऊन नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढून दहशत माजवणाऱ्या कायद्याच्या गुन्हेगाराविरुद्ध ऍट्रॉसिटी व मकोका कलमे समाविष्ट होतील व प्रकरण जलदगती न्यायालयात सुरू होईल, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक गंभीर प्रकरणातील सराईत गुन्हेगारानी अनेक कुटुंबे उध्वस्त केली आहेत.
पाचोंदा येथील पीडित दलित कुटुंबियांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून पीडितांना दिलासा मिळावा व त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी कॉ.शंकर सिडाम, मनोज किर्तने आणि कॉ.गंगाधर गायकवाड हे प्रयत्नशील असून निवेदन प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


















