मंगळवेढा – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक साठीची मतमोजणी सोमवार दिनांक 9 रोजी होणार असून त्यासाठी मंगळवेढा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यात शनिवार दिनांक 7 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात सुमारे 65.52 टक्के मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा या ठिकाणी पार पडणार आहे.
सोमवारी सकाळी बरोबर 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून तत्पूर्वी उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल. 9.45 वाजता मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येईल व त्यानंतर 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सर्वप्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यानंतर लगेच मशिनवरील मतमोजणी केली जाणार आहे.
मशीनवरील मतमोजणीसाठी 20 टेबल व टपाली मतमोजणी साठी 4 असे एकूण 24 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार आहे.
मतमोजणीच्या एकूण 11 फेऱ्या होणार असून प्रथम 53 संत दामाजीनगर व त्यातील 105 संत दामाजीनगर गण व 106 बोराळे गण यांची मतमोजणी होईल. त्यानंतर 54 हुलजंती गट व त्यातील 107 हुलजंती गण व 108 मरवडे गण, त्यानंतर 55 लक्ष्मी दहिवडी गट व त्यातील 109 संत चोखामेळानगर गण व 110 लक्ष्मी दहिवडी गण तसेच सर्वात शेवटी 56 भोसे गट व त्यातील 111 भोसे गण व 112 रड्डे गण याप्रमाणे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल.
एका गटाचे व त्यातील गणांचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षात गेल्यानंतर त्या गटाची पूर्ण मतमोजणी झाल्यानंतरच त्यांना बाहेर येता येणार आहे.
सकाळी 10 ते साधारण दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व गट व गणांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
मतमोजणी साठी एकूण 168 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून 4 रो ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणी साठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवार व प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आले असून कुणालाही मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही.
मतमोजणी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
मतमोजणी केंद्राच्या परिसरात मीडिया कक्ष तयार करण्यात आला असून माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी 1 नायब तहसीलदार व 3 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी होणाऱ्या मतमोजणी साठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली असून मतमोजणी प्रकिया शांततेत पूर्ण केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली आहे.





















