सांगोला – तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जि.प व पं.स निवडणुकांमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जि.प गटातून ॲड.यशराजे दिपकराव साळुंखे पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र पराभवाने खचून न जाता त्यांनी जवळा जि.प गटातील १३ गावांमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या आवाजात जिद्द दिसून आली. कार्यकर्त्यांच्या भावना हीच माझी खरी शिदोरी आहे. पराभव झाला म्हणून घरात बसणार नाही; तुमच्या सुख-दुःखात कायम उभा राहीन. झालेला पराभव विसरून आपण विकासाच्या दिशेने एकत्र वाटचाल करूया, असे आवाहन ॲड.साळुंखे पाटील यांनी केले.
यावेळी वाढेगाव पं.स गणातून वंदना भरत शेळके तसेच जवळा पं.स गणातून पुनम सुदर्शन इंगवले ह्या विजयी झालेल्या सदस्यांनी विविध गावांमध्ये उपस्थित राहून मतदारांचे आभार मानले. जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करून दाखवू असा विश्वास व्यक्त करत आगामी काळातही एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यशाने यंदा हुलकावणी दिली असली तरी अपयशाने मी खचणार नाही. आमच्या साळुंखे पाटील कुटुंबाच्या रक्तातच जनसेवा आहे. लोकसेवेची बांधिलकी भविष्यातही तेवढ्याच ताकदीने जपणार आहे.
– ॲड.यशराजे साळुंखे पाटील
























