तहसील,पंचायत समितीची मध्यस्थी ; जागेचा व रस्त्याचा अहवाल दोन दिवसात देणार
मुदखेड ता प्र
स्मशानभूमी रस्ता व जागेसाठी शासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले उपोषण ग्रामपंचायत चे ठोस आश्वासन, तहसील व पंचायत समितीच्या मध्यस्थीने पाचव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले असून जागी संदर्भातील अहवाल दोन दिवसात संबंधित प्रशासनाला सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
तालुक्यातील निवघा या गावातील स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद व्यंकटराव पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यामध्ये मराठा /मातंग तसेच बौद्ध स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता चिखलमय तसेच खडतर असल्याने या रस्त्याचे तात्काळ मजबुतीकरण करण्याची मागणी केली होती. यासोबतच लिंगायत समाज तसेच मुस्लिम समाज यांच्या दफन विधीसाठी गावठाण जागा नमुना नंबर आठ ला लावण्याची मागणी केली होती. यापूर्वी स्मशानभूमीच्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते परंतु प्रश्न निकाली काढण्यात स्थानिक प्रशासन, संबंधित प्रशासन यांनी हेतू परस्पर दुर्लक्ष केले होते. स्मशानभूमीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते .
अखेर आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी ग्रामपंचायत, तहसील व पंचायत समिती ला जाग आली.
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या आदेशाने विस्तार अधिकारी निलेश बंगाळे, तलाठी मुळेकर, ग्रामसेवक एम के मोरे, उपसरपंच उद्धव पवार निवघेकर यांनी उपोषणकर्त्याची भेट घेत प्रमुख मागण्या संदर्भात चर्चा केली. यानंतर शिष्टमंडळाने लेखी ठोस आश्वासन दिले. आमरण उपोषण करते प्रमोद पवार यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाने याविषयी लवकरात लवकर पाठपुरावा करून संबंधित प्रश्न निकाली काढावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्ते प्रमोद पवार यांनी दिला.
यावेळी शिवा संघटनेचे तालुका प्रमुख प्रकाश कांचनगिरे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मुदखेड प्रताप देशमुख, मनमत राजेवार ओमप्रकाश पवार, योगेश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा पवार ,गंगाधर राजेवर , वैजनाथ राजेवर , चंद्रकांत राजेवार, नारायण नरडेले, श्रीरंग केंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्मशानभूमी च्या मागण्या संदर्भात सुरू असलेल्या आमरण उपोषणासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याशी चर्चा करून लक्ष वेधले. यानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळात अ ब क ड चा सविस्तर अहवाल ग्रामपंचायत ने सादर केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. संबंधित अहवाल ग्रामपंचायत ने दोन दिवसात प्रशासनाकडे सादर करण्याचे ठोस लेखी आश्वासन देण्यात आले आहे.