पंढरपूर – येथील वैकुंठ स्मशानभूमीत सुवासिनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोन्याच्या लालसेने चक्क तिची राख पळविण्याच्या घटनां मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारा नंतर तिसऱ्या दिवशी अनेक वेळा राख नसल्यामुळे मयताच्या नातेवाईकांना नुसती अंत्यसंस्कार केलेल्या जागेची पुजा करुन घरी परतावे लागत आहे. त्यामुळे खरोखरच मड्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा म्हणतात ना त्या प्रमाणे आहे हा प्रकार. दरम्यान या प्रकाराकडे गांभिर्याने पाहून पालिकेने तसेच पोलिस प्रशासनाने संबंधितांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे.
शहर तसेच उपनगरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्याच्यावर येथील गोपाळपूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावे लागतात. शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास येथे एकच स्मशानभूमी असल्यामुळे साधारणपणे दररोज येथे एक, दोन मयतांवर अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या काही वर्षांपासून येथील स्मशानभूमीची अवस्था देखील दयनीय झाल्याचे दिसत आहे.
या स्मशानभूमीत सुवासिनी महिलांवर अत्यसंस्कार केल्या नंतर त्यांच्या अंगावरील सोने मिळविण्याच्या लालसेने अंत्यसंस्कारा नंतर रात्रीच्या वेळी स्मशानातून राख देखील गायब केली जाते आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मृतांच्या नातेवाईकांना तिसऱ्या दिवशी पुजेसाठी राख न राहिल्यामुळे केवळ अग्नी दिलेल्या जागेची पुजा करुन घरी परतावे लागते आहे. त्यामुळे या प्रकाराकडे पालिकेने तसेच पोलिस प्रशासनाने गांभिर्याने पाहून याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी शहर तसेच उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
—————————–
कायमस्वरुपी सुरक्षा व सीसीटिव्हीची व्यवस्था आवश्यक
येथील स्मशानभूमीत सोन्याच्या लालसेने राख चोरुन नेण्याच्या घटना वाढत असल्यामुळे पालिकेने या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. या बरोबरच या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणेची देखील गरज आहे. त्यामुळे राखे मधील सोने चोरणाऱ्या मंडळींना चांगली जरब बसुन येथे चालणारे अवैध प्रकार किंवा अवैध धंदे बंद होण्यास मदत होईल


















