अकलूज – येथील महावीर पथावरील जैन मंदिराशेजारी रूपाली मशनरी या दुकानास पहाटे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने जीवित हानी झाली नाही चार्जिंगला लावलेली दोन चाकी पहाटे साडेचार ते पाच च्या दरम्यान पेटल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दुसरी संघामध्ये शॉर्टसर्किटने आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे लागलेल्या आगीत चार चाकी दोन चाकी दोन वाहनासह दुकानातील कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
याबाबत उपस्थितांच्या चर्चेतून समजलेली प्राथमिक माहिती अशी की, अकलूज येथील महावीर मंदिराला चिकटून असणाऱ्या रुपाली मशीनरी या पाईप, सबमरसिबल व विहिरीवरील मोटरी विकणाऱ्या दुकानाला पहाटे आग लागली. दुकानाच्या बाहेर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इलेक्ट्रिकल दुचाकी चार्जिंगला लावली होती. ती ओव्हर चार्ज होऊन पेटली असावी किंवा दुकानातील वायरिंग शॉर्ट सर्किट झाले असावे असे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. दुचाकी पेटल्यानंतर तिच्या शेजारी असलेल्या चार चाकी वाहनाने पेट घेतला. या दोन्ही वाहणाने पेट घेतल्यामुळे दुकानाला आग लागली. सदर दुकानामध्ये विहिरीवरील मोटरी, पिव्हीसी पाईप, केबल, तांब्याच्या तारा असा माल असल्यामुळे आग भडकली. कोट्यावढी रुपयांचा माल या आगीत जळून खाक झाला आहे.
आगीची माहिती समजताच अकलूज नगर परिषदेचे टँकर बोलवण्यात आले. या टँकरची प्रेशर क्षमता कमी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना, यशवंतनगर येथील सहकार महर्षी साखर कारखाना व सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखान्याच्या अग्निशमनच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली. अकलूज नगर परिषदेचे दोन टँकर पाच वेळा भरून आणावे लागले. सुमारे दहा ते पंधरा गाड्या भरून पाणी मारल्यानंतर आग विझली.
पुढील बाजूस दुकान आणी मागील बाजूस घर अशी रचना होती. घरामध्ये सुहास श्रेणिक गांधी, त्यांची दोन मुले, सुन व दोन नातू इतके लोक रहात होते. आग दुकानाच्या तोंडालाच लागली असल्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घरामागील खिडक्या तोडून आतील लोकांना बाहेर काढले. पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन त्या रोडवरील वाहतूक वळवली. जेसीबीच्या सहाय्याने शटर, ग्रील तोडून दुकानात पाणी मारले. दुकानाला लागलेली आग प्रचंड भडकलेली होती. ती शेजारील एच डी एफ सी बँकेत पोहोचली. आगीमुळे बँकेचा दरवाजा, पुढील भाग, ए टी एम रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील जैन समाजाच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी खूप मेहनत घेतली. आगीची माहिती समजताच माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश व्होरा, आदित्य आर्वे, नगरसेवक महेश शिंदे, योगेश गांधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यत आग विझवण्याचे काम सुरु होते.
सन 2021 साली अकलूज नगर परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. 2021 पासून जानेवारी 2026 पर्यंत नगर परिषदेवर प्रशासकाचा कारभार चालत होता. या काळात नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा अद्यावत करण्यात आली नाही. आज जेव्हा आग लागली तेव्हा नगर परिषदेचे टँकर कुचकामी ठरले. या टँकरने कितीही पाणी मारले तरी आग विझत नव्हती. जेव्हा परिसरातील साखर कारखान्याच्या गाड्या आल्या व त्यांनी प्रेशरने पाणी मारले तेव्हा आग विझली. अकलूज नगर परिषदेने आपली अग्निशमन यंत्रणा आद्यवत करून घेणे गरजेचे आहे.
अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष रेश्मा आडगळे उप नगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
















