मध्यप्रदेशच्या महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. याचदरम्यान मंदिराच्या गर्भगृहाला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच भाविक धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू करत मंदिराच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने मंदिरातील पुजाऱ्यासह 13 भाविक आगीत होरपळले आहेत.
आगीची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत जखमी झालेल्या 13 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जखमी भाविकांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.