सोलापूर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तर महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत दि.११ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. शहराच्या चौका चौकात बॅनर झळकत आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मतदारांना हे बॅनर आकर्षित करण्यासाठी लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुक आणि आजी-माजी नगरसेवक तयारीला लागलेले दिसत आहेत. वास्तविक पाहता नो बॅनर झोन असताना देखील हे बॅनर लावलेले दिसून येत आहेत. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काही ठिकाणी बॅनर लावलेले आहेत. त्यावर पक्षांचे चिन्ह तसेच इच्छुकांचे फोटो लावलेले दिसत आहेत. काहींनी जुना पक्ष सोडून भाजप प्रवेश केल्याने आपले बॅनर लावून पोस्टरबाजी करताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात, गुरुनानक चौक तसेच अंत्रोळीकर नगर परिसरात हे पोस्टर लावलेले दिसत आहेत. वाढदिवसानिमित्त तसेच महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख चौकात बॅनर झळकत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
फोटो ओळ – सोलापूर शहरातील गुरुनानक चौक आणि अंत्रोळीकर नगर परिसरात लावलेले बॅनर दिसत आहेत.

















