सोलापूर : समाजातील वंचित आणि गरजू विद्यार्थिनी, महिलांसाठी काम करण्याचा वारसा कायम ठेवत आई प्रतिष्ठानने यंदाच्यावर्षीही गरजूंची दिवाळी गोड केली. दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या
कामगार आणि शेतकऱ्यांच्या ५०० विद्यार्थिनींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त ड्रेस मटेरियल देण्यात आले.
दयानंद महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात गुरुवारी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, वैशाली कबाडे, नित्यानंद दरबी, रेखा दरबी, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, डी.ए.व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. व्ही. शिंदे, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या एस. जे. गायकवाड, डी. पी. बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीनींना ड्रेस मटेरियल देण्यात आले. वैशाली कबाडे म्हणाल्या, मोबाईलमुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी अशा घटनांपासून दूर रहावे. विद्यार्थिनींनी शारीरिक, मानसिक आरोग्य जपावे. सकाळी चालणे, ध्यान, योग यांची आपल्याला आवश्यकता
आहे. आई प्रतिष्ठानने संकटाच्या काळात महिलांना आधार दिला आहे. पोलीस उपायुक्त विजय कबाडे म्हणाले, दातृत्व असणारी माणसे समाजात कमी होत आहेत. दातृत्व असणाऱ्या व्यक्तींमुळे समाज टिकून आहे. सर्वांना दिवाळी साजरी करता यावी याकरिता आई प्रतिष्ठानने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राखी गवळी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विद्या कोठारी यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी अर्णव डांगरे, राहुल डांगरे, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, लक्ष्मीकांत येलदी, अंबादास पोगुल, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्याल आदी उपस्थित होते.

















