तभा फ्लॅश न्यूज/ बांगलादेश(ढाका) : ढाकामधील उत्तरा परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. बांगलादेश हवाई दलाचं F-7 BGI प्रशिक्षण विमान थेट माइलस्टोन स्कूल आणि कॉलेज या शैक्षणिक संस्थेच्या आवारात कोसळलं. विमान कोसळतानाचा आवाज इतका प्रचंड होता की शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा जीवितहानीपासून बचाव झाला आहे.
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विमान प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याची शक्यता आहे. अग्निशमन विभाग, पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं आहे. अधिक तपास सुरू आहे.