वसमत / हिंगोली: नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस (आय) पक्षाचा दावा करत मैदानात उतरलेले अजगर पटेल अखेर नामनिर्देशनच्याच टप्प्यावर बाद झाले. 12 सप्टेंबर 2001 नंतरच्या चौथ्या अपत्याचा नियम चुकवल्याचा मुद्दा विरोधी उमेदवार शेख यासीर शेख हबीब यांनी अचूक पकडत आक्षेप दाखल केला होता.
या आक्षेपावर दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर झालेल्या सुनावणीने प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. आक्षेपकर्ता बाजूने उभे टाकलेले ॲड. फैसल आलम यांनी निवडणूक नियमांची अशी धारदार, नेमकी आणि कायद्याला धरून मांडणी केली की प्रतिस्पर्धी बाजूला प्रतिवादाचीही संधी उरली नाही.
ॲड. आलम यांनी चौथ्या अपत्याचा लागू असलेला नियम स्पष्ट करत “निवडणूक ही नियमांची आहे, भावनांची नाही. नियमभंग झाला तर उमेदवारी टिकत नाही,”असा थेट, कडवा आणि निर्विवाद मुद्दा मांडला.त्यांच्या प्रखर युक्तिवादाला पूर्ण मान्यता देत उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आक्षेपकर्ता शेख यासीर यांचा दावा मंजूर केला आणि अजगर पटेल यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्याचे आदेश दिले.या निर्णयानंतर वसमतच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा“ॲड. फैसल आलम यांच्या एका सुनावणीने संपूर्ण समीकरणच हलवले!”


















