मुंबई – महायुती सरकारमधील दोन घटक पक्षाच्या नेत्यातील दाव्यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या निवडणुकीतील सस्पेन्स आता संपला आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सलग चौथ्यादा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतुन माघार घेतल्याने पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
असोसिएशनच्या एकूण 31 सदस्य संघटनांपैकी 22 जणांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड होते. त्यामुळे मोहोळ यांनी शेवटच्या क्षणी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला.त्याबदल्यात मोहोळ यांच्या समर्थकांना काही पदे दिली जातील, असे सांगण्यात आले.
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या भूखंड विक्री व्यवहारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत अर्ज भरल्याने महायुतीत चढाओढ चर्चेत आली होती. त्यामुळे वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले. त्यानंतर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. या निवडणुकीतून अजितदादा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ते क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.
———====—–
संघटनाचा अजितदादांवर विश्वास
राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात अजित पवार यांचा दीर्घ अनुभव आणि बेरजेचे राजकारण व यामुळे सर्व पक्ष आणि हितसंबंधी संस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकत्रित विश्वास दाखवला. राज्यातील क्रीडा आस्थापनांचे सशक्तीकरण, खेळाडू कल्याण आणि पारदर्शी व्यवस्थापन त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्या.




















