सोलापूर – शिवसेना शिंदेगट व अजितदादा गटाच्या वतीने रविवारी दुपारी होडगी रोड येथील लोटस हॉटेल येथे बैठक घेण्यात आली. बैठकी अंति दोन्ही पक्षांनी युती केल्याचे स्पष्ट करत समसमान जागांवर आम्ही निवडणूक लढणार आहोत, सोलापूर महापालिकेत महापौर हा आमच्याच युतीतील बसणार असल्याचा दावा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या आठ दिवसांपासून भारतीय जनता पार्टी बरोबर महायुती बाबत बोलणी सुरू होती. परंतु जागा वाटपांवर निश्चिती होत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 36 जागा आम्ही मागितल्या होत्या. भाजपकडून सन्मान जनक प्रस्ताव आला नाही, आम्हाला कमी लेखले गेले. कोणत्या जागेवरती कोणता पक्ष लढणार हे लवकरच सांगू. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या माध्यमातून मोठा निधी आणून सोलापूरचा विकास करण्याबाबत आमचा प्रयत्न असेल अशी माहिती संतोष पवार यांनी बोलताना दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल, चंद्रकांत दायमा, महेश साठे, यू. एन. बेरिया, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, अमोल शिंदे, अमर पाटील, सचिन चव्हाण, मनीष काळजे, मनोज शेजवाल, अर्जुन सलगर, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, आप्पासा म्हेत्रे, वसीम बुरान आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राचे संवेदनशील नेतृत्व एकनाथ शिंदे व अजितदादा हे धाडसी नेतृत्व या दोन्ही पक्षांची जर सत्ता महापालिकेत लोकांनी आणून दिली, निधी कमी पडणार नाही. विकासकामे, रखडलेली कामे मार्गी लावण्यात यशस्वी होऊ. आम्ही दोघे मिळून प्रचंड ताकतीने लोकांसमोर जाऊ.
– अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख



























