१८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्यावी!
; ना.तहसीलदार जेठे यांचे आवाहन
माहूर , दि. २७ जून
८३-किनवट मतदार संघाच्या माहूर तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी मोहिमेत सहभागी होवून, मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करुन घ्यावी!”असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार माहूर यांच्यावतीने, कैलास जेठे नायब तहसिलदार यांनी केले आहे.
माहूर तहसील कार्यालयात दि. २६ जून रोजी दुपारी ३:०० वाजता तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीस तालुक्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती.बैठकीस कैलास जेठे नायब तहसिलदार निवडणूक यांनी मार्गदर्शन केले. आणि पर्यवेक्षक संजय खडकेकर यांनी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी करावयाच्या कार्यवाही विषयी त्यांना सविस्तर सुचना देण्यासाठी सदर बैठक आयोजित केलेली होती. मा. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या ह्या पुनर्निरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि.२५जुन ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एल.ओ. यांच्याव्दारे त्यांचे मतदार यादी भागामध्ये घरोघरी भेटी देवून मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच वरील कालावधीत नवमतदारांची नोंदणी केली जाणार असून, मतदार यादीतील दुबार नावांची व मयत मतदारांची नांवे खात्री करुन वगळली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मतदारांचे मतदार यादीमधील फोटो योग्य त्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन अद्यावत केली जाणार आहेत. या शिवाय मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण देखील करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी दि.२५ जुलै २०२४ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवारी, रविवारी दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष मोहीम देखील राबविली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत १९ ऑगस्ट २०२४ पर्यत राहणार असून, २० ऑगस्ट २०२४ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाणार आहे.
०१ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पुर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून मतदार यादीत नांवे नोंदविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या मतदार यादी पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नांवे नोंदणी न झालेल्या व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नांव मतदार म्हणून नोंदविता येणार आहेत.
तरी ८३-किनवट मतदार संघाच्या माहूर तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी ह्या मोहिमेत सहभागी होवून, मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करुन घ्यावी ! असे आवाहन याप्रसंगी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार माहूरचेवतीने कैलास जेठे नायब तहसिलदार यांनी केले आहे.