तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ मुंबई या संस्थेला आपली घटक संस्था म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे.
या संघाची विशेष सभा अध्यक्ष श्री. दिलीप दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन अंधेरी (मुंबई) येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी पार पडली.या सभेत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रायोगिक रंगभूमीची चळवळ विस्तारण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक रंगमंच संघाच्या शाखा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रारंभी सोलापूर, सातारा, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील शाखांची स्थापना करण्यात आली असून, पुढील मान्यवर रंगकर्मींवर त्या , त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवीण्यात आली आहे.
रंगकर्मी जयप्रकाश कुलकर्णी यांच्यावर सोलापूर, रंगकर्मी डॉ. निलेश माने यांच्यावर सातारा, रंगकर्मी हर्षद माने यांच्यावर रायगड, तर रंगकर्मी युगीन पाटील यांच्यावर पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय शाखांच्या माध्यमातून स्थानिक रंगकर्मींना सक्रीय सहभागी करून प्रायोगिक रंगभूमीच्या विचारांची आणि प्रयोगांची सशक्त पेरणी महाराष्ट्रभर करण्याचा मानस आहे. या प्रसंगी संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. अनिल बांदीवडेकर यांनी प्रायोगिक रंगमंच संघ मुंबईत लौकरच प्रायोगिक रंगकर्मींसाठी महत्त्वपूर्ण असे उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले .
प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सर्व रंगकर्मींना ‘प्रायोगिक रंगमंच संघ या संस्थेचे सभासद होऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सहकार्यवाह दत्ता सावंत यांनी केले आहे. कोषाध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 61