सोलापूर : विमान सेवा, आयटी पार्क, उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी, रस्ते यासह उड्डाणपूल सोडून सोलापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. सहा महिने अवधी लागणारी 892 कोटीच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुरी प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केली. या योजनेमुळे शहरातील पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेत दिली.
विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी महापालिकेत आले असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे , विणा पवार , उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदींसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरच्या शहर विकास आणि महापालिकेचा संदर्भातील विविध विकास कामे आणि योजनांच्या पूर्ततेचा आढावा मांडला. महापालिकेत 154 कोटीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ केला. स्वच्छ सोलापूर हा संकल्प केला होता, त्यासाठी आवश्यक साधनेही महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. सोलापूर स्वच्छतेचे काम वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत 39 कोटीची कामे होत आहेत. महापालिकेच्या शौचालयांची स्थिती बेकार होती, ती कामेही आता मार्गी लागले आहेत. स्वीपर मशीन उपलब्ध केली असल्याने शहरातील रस्ते स्वच्छ होतील. कर्मचारी अंतर्गत रस्ते स्वच्छतेची कामे करतील. या स्वीपर मशीनमुळे महापालिकेचे दरमहा आठ लाख रुपये वाचणार आहेत.
सोलापूर शहरात तीनही आमदार शहर विकासाची भूमिका घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम आहे. जे जे मागितलं ते ते मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. प्रत्येक प्रश्न मार्गी लागला. उड्डाणपूल सोडून शहराच्या विकासाची सर्व विषय आणि प्रश्न मार्गी लागले आहेत. उड्डाणपुलाचे काम ही तडीस नेण्यात येणार आहे. विमानसेवा हा सोलापूरच्या अस्मितेचा विषय होता. ती ही सुरू झाली. अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. काही लोकांनी गॅरंटी दिली होती मात्र ही विमानसेवा आजही चांगली सुरू आहे. लवकरच बेंगलोर आणि तिरुपतीची विमान सेवा चालू होईल, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.
उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. आता रोज पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. 40 वर्षांपूर्वीच्या या जुन्या जलवाहिनी आहेत. नव्याने सर्व अंतर्गत जलवाहिन्या टाकाव्या लागतील. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. तातडीने 892 कोटीच्या योजनेला त्यांनी मंजुरी दिली. जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार असून 200 कोटीचे बाँड काढण्याचा प्रस्तावही दिला. जी प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण होणार होती, ती प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात यशस्वीपणे राबविली. या योजनेचे निवडणुकीपूर्वीच टेंडरही निघाले आहे. यामुळे पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्याचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.
सोलापूर शहरातील बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी आयटी इंडस्ट्री आली पाहिजे. त्यासाठी आयटी पार्कचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. अशा पद्धतीने शहराचे छोटे-मोठे प्रश्न सुटले आहेत. शहर विकासासाठी सर्व गोष्टी केल्या आहेत. सोलापूरच्या जनतेने भाजपाला भरभरून प्रेम दिले. शहरात तीन आमदार निवडून दिले आहेत. सोलापूरच्या अपेक्षापूर्तीसाठी सर्व योजनांची अंमलबजावणी आम्ही केली आहे. भाजपा आणि भाजपचे तीनही आमदार यांनी सर्व आश्वासने पूर्ण केले आहेत. जनतेच्या आशीर्वादाची उतराई करण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपच्या पाठीशी उभे राहील. झोळी भरून आशीर्वाद देईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
892 कोटीची शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा योजना कमी वेळात गतीने मार्गी लावली. याबद्दल महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदारांचे आभार मानले. प्रारंभी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी महापालिकेने राबविलेल्या विविध योजना आणि कामांचा सविस्तर आढावा मांडला. महापालिकेच्या वतीने 140 विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. मिळकतीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विविध नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध आहेत यासह विविध कामांची माहिती दिली.
सोलापूरसाठी ज्या घोषणा केल्या
त्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या : आ. सुभाष देशमुख
यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, 2014 पासूनचा कार्यकाळ पाहता शहरातील विविध कामे मार्गी लागली. आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही योजना अथवा कामाला कधी नकार घंटा वाजवली नाही. सकारात्मकपणे ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केले आहेत. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून विमानसेवा, आयटी पार्क मंजूर करून घेतले. शहराचा पाणी प्रश्न ही मार्गी लागत आहेत. शहराला सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यानंतर आता 892 कोटीच्या योजनेमुळे तोही प्रश्न मार्गी लागेल. पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त हे एकाच गावचे असल्याने आयुक्तांवर विशेष प्रेम आहे. तुमची जोडी कायम राहो. पालकमंत्र्यांचे साताऱ्यापेक्षा सोलापूर कडे विशेष लक्ष आहे. सोलापुरातील वृत्तपत्रात ज्या ज्या समस्या मांडल्या जातात त्या प्रशासनाने सोडवाव्यात. रोजगार देणारे सोलापूर व्हावे, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
महापालिका आयुक्तांचे केले कौतुक
सोलापूर शहरातील स्वच्छता शौचालय यास इतर योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चांगली जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनीही चांगले काम केले. याबद्दल महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले.
























