अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत वानखेडे यांना चौकशीकरता आठ समन्स पाठवण्यात आली आहेत, पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झालेले नाहीत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या चौकशीची मान्यता दिल्यास चौकशी समितीची स्थापना केली जाऊ शकते. समीर वानखेडे यांनी बॉलिवूड आणि डग्ज कनेक्शनची प्रकरणे बाहेर काढत कारवाईचा धडाका सुरू केला होता. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावले होते.
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. आर्यनकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगत एनसीबीने त्याला अटक केली होती. त्यामुळे आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले होते. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. मात्र, नंतरच्या काळात समीर वानखेडे यांनी आर्यनला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याची माहिती समोर आली होती. आर्यनला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप झाला होता. यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांची एनसीबीच्या संचालकपदावरुन उचलबांगडी झाली होती आणि त्यांच्यामागे न्यायालयाचा ससेमिरा लागला होता.