वेळापूर : ग्रामपंचायतीकडून सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील ५ टक्के दिव्यांग निधीअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. ग्रामपंचायतीस या वर्षी दिव्यांग कल्याणासाठी एकूण रुपये २ लाख १७ हजार ८८६ इतका निधी खर्च करावयाचा होता. त्यानुसार ग्रामपंचायतीमार्फत १८ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये निर्वाह भत्ता धनादेशाच्या स्वरूपात देण्यात आला.
या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आज ग्रामपंचायत वेळापूर येथे पार पडला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासो मुंगुसकर तसेच ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच रजनीश बनसोडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांनी लहान-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी करावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वतः स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी लाभार्थ्यांना केले.
या कार्यक्रमास वेळापूर येथील लाभार्थी, ग्रामस्थ, दादा तुपे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश जाधव, महेश देवकते, बाबा तुपे दीपक जाधव व सौ. पूजा लावंड आदी उपस्थित होते.


























