मुंबई, १५ जुलै (हिं.स.) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोदींना परदेशात झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ आहे, पण मणिपूरमधील आदिवासींच्या हत्याकांडावर बोलायला किंवा पिडितांची भेट घ्यायला त्यांनी अजूनही वेळ काढलेला नाही.
आंबेडकर यांनी मोदींच्या प्राथमिकता संदर्भात सवाल उपस्थित केले आहेत – “आता भारताच्या ऐवजी अमेरिका त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का?” असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
रविवारी अमेरिकेतील बटलर, पेनसिल्वेनिया येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबारावर पंतप्रधान मोदींनी तीव्र निषेध व्यक्त केला. पण, मणिपूरमधील आदिवासींच्या हत्याकांडावर मोदींनी मौन बाळगले असून, त्यांनी मणिपूरमधील पीडितांची भेट घेण्याची तयारी दर्शवलेली नाही.