उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा जिंकण्याची घोषणा केल्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी दंड थोपटलेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन अमोल कोल्हे सोबत शरद पवार यांच्यावर शाब्दिक वार केले आहेत, अमोल कोल्हे यांनी काल त्याला प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.
आम्ही साठ वर्षाचे झालो तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे असं जर कोण म्हणतं असेल तर मग इतके वर्ष संधी दिली कोणी ? याचा पण विचार करावा, असा सल्ला अमोल कोल्हे यांनी दिला. लोकसभेच्या जागावाटपात पक्ष सोडून ३ आणि ४ जागांवर समाधान मनात असाल तर याच साठी केला होता का अट्टाहास असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
पुण्यात मूलनिवासी मुस्लीम मंच आणि भीमआर्मी, बहुजन एकता मिशन, संभाजी ब्रिगेड, रिजनल ख्रिश्चन सोसायटी आणि इतर फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या पुण्यातील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी “अमन का कारवा” या कार्यक्रमाला अमोल कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
शिरूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेऊन अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले, काल शरद पवार यांच्यावर जी काही टीका करण्यात आली यातील वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर २०१४ पासून शरद पवार कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही. आम्ही साठ वर्षाचे झालो तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे हे जर कोण म्हणत असतील तर मग इतकी वर्ष संधी कोणी दिली? तसेच २०१९ च्या सकाळच्या शपथविधी नंतर देखील मन मोठं करून ही संधी कोणी दिली,असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जी टीका केली, त्याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, पवार साहेब यांनी काय केलं हे जनता सागेल,महिलांना शेतकऱ्याना माहिती आहे की पवार साहेब कोण आहेत,याला महाराष्ट्रतील जनता उत्तर देईल.असं यावेळी कोल्हे म्हणाले.
भाजप अजित पवार यांना लोकसभेच्या तीन जागा देणार आहे, याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा कळलं की प्रादेशिक पक्ष संपवणायचा काम करत आहे. जर ५-६ जागांवर बोळवण होत असेल आता तर विचार करण्याची वेळ आहे,असं यावेळी कोल्हे म्हणाले.