मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्याराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्यातील ऍड. रुपाली ठोंबरे व आ. अमोल मिटकरीं यांची प्रवक्तेपदावरुन डच्चू देण्यात आला असून आ. सना मलिक, सूरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी घेतलेला पंगा रुपाली ठोंबरे- पाटील यांना भोवला आहे.तर महायुतीतील मित्रपक्ष भाजपा व सेनेवर वारंवार टीका करत असल्याने आ. मिटकरी यांना पदावरून काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यापासून रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे- पाटील यांच्यात उघडपणे वाद सुरु होता. फलटणच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर चाकणकर यांनी त्यांच्या चारित्र्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने ठोंबरे यांनी त्यांच्यावर उघडपणे टीका करीत राजीनाम्याची मागणी केली होती. त्याबाबत पक्षाने
दोन दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 7 दिवसांत खुलासा मागितला असून पक्षाने आज जाहीर केलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले. दुसरीकडे, महायुतीमधील घटकपक्ष विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात रोखठोक भूमिका घेणाऱ्या आ. अमोल मिटकरी यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनिल पाटील, रुपाली चाकणकर, सना मलिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर,ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, आनंद परांजपे, आदींची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी नवीन यादी जाहीर केली आहे, त्यात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांनाही पुन्हा प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मारहाण प्रकरणानंतर चव्हाणांचं युवक प्रदेशाध्यक्ष पद काढण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत त्यांना संधी देण्यात आली आहे. अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यांच्यासह वैशाली नागवडे या विद्यमान प्रवक्त्यांना नव्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.




















