बार्शी – भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने तसेच फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “कश्मीर ते कन्याकुमारी” या एकूण ४२५० कि.मी. अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली दि. ३१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असून देशभरातील निवडक सायकलस्वार त्यात सहभागी होणार आहेत.
या प्रतिष्ठित रॅलीसाठी वृक्ष संवर्धन समिती बार्शी, बार्शी सायकलिंग क्लबचे सदस्य व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांची निवड झालेली आहे. ही बार्शी व सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या सहभागामुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होणार आहे.
या निवडीबद्दल बार्शी रनर्स क्लब, बार्शी सायकलिंग क्लब, सोलापूर ग्रामीण पोलीस दल, माढा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, वृक्ष संवर्धन समिती बार्शी, सर्व मित्र परिवार यांच्यावतीने अमृत खेडकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी उपविभागीय अधिकारी अशोक सायकर, आणि माढा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी बंडगर यांनीही अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

















