पंढरपूर – येथील एका सराफ व्यापाऱ्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करून अज्ञात लोकांनी त्याची बॅग पळवून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास घडली आहे. या घटने मध्ये जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव दिलीप कदम असे आहे.
पंढरपूर शहरातील अन्नपूर्णा हॉटेलसमोर एस. टी. कदम या ज्वेलर्स दुकानाचे मालक दिलीप कदम हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून (एम एच १३ सी सी ९९५०) या क्रमांकाच्या दुचाकीवरून निघाले होते. ते कराड रोडवरील वरद विनायक रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर आले असता, मागील चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली. ते रस्त्यावर पडल्यानंतर त्यांची बॅग त्या चार चाकी वाहनातील अज्ञात व्यक्तींनी पळून नेली आहे.
दरम्यान ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर दिलीप कदम यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कदम यांचे काही आर्थिक नुकसान झाले आहे का याची तपासणी पोलिस प्रशासनाकडून सुरू होती.
























