सोलापूर – दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सोलापूर जिल्ह्याचा स्वतंत्र अंध मुला-मुलींचा क्रिकेट संघ तयार करण्यासोबतच, अंध महिला क्रिकेट संघाचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतला आहे.
अशा प्रकारे महिला अंध क्रिकेट संघाचे पालकत्व स्वीकारणारी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव संघटना आहे.
भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि टी-२० विश्वचषक विजेती खेळाडू गंगा संभाजी कदम हिने रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अंध खेळाडूंच्या अडचणी मांडल्या होत्या. सोलापूरच्या ग्रामीण भागात गुणवत्ता असूनही केवळ संधी आणि अधिकृत पाठबळाअभावी हे खेळाडू मागे राहत असल्याची खंत तिने व्यक्त केली होती.
त्यानुसार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या पत्राची गंभीर दखल घेत केवळ संघ स्थापनेचे आश्वासन दिले नाही, तर या संघाची संपूर्ण जबाबदारी आणि ‘पालकत्व’ स्वीकारण्याचा शब्द दिला. यामुळे आता महिला अंध क्रिकेटपटूंना जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या छत्राखाली अधिकृत सराव, दर्जेदार किट, प्रशिक्षक आणि मैदानाची सोय उपलब्ध होणार आहे. स्वतः गंगा कदम या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असून, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या या भूमिकेमुळे दिव्यांग खेळाडूंसाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडले गेले आहेत.
——-
अंध खेळाडूंचा आत्मविश्वास वाढणार
महिला सक्षमीकरण: महिला अंध क्रिकेट संघाला हक्काचे पालकत्व मिळाल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.
नवे खेळाडू घडणार: गंगा कदम प्रमाणेच सोलापूरचे इतर खेळाडूही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतील.
राज्यात प्रथम: महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा असोसिएशनने अद्याप अशा प्रकारे अंध महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारलेले नाही, त्यामुळे सोलापूरने नवा आदर्श ठेवला आहे.
शासकीय संधी: अधिकृत संघामुळे या खेळाडूंना भविष्यात नोकरी आणि इतर शासकीय सवलती मिळणे सुलभ होईल.
——-























