जालना – नूर हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, वारुडी (पोस्ट गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) येथे कार्यरत नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी या कामगारांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कामगार संघटनेतर्फे मा. व्यवस्थापक, नूर हॉस्पिटल यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत —
सेवेत कायम करणे — दीर्घकाळ काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे.
किमान वेतन कायद्यानुसार वेतन — कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे योग्य वेतन मिळावे.
इन्शुरन्स सुविधा — सर्व कामगारांचा विमा राबवून त्याचे टर्म प्रीमियम हॉस्पिटल प्रशासनाने जमा करावे.
पगारवाढ करार — नियमित पगारवाढीसाठी करार करावा व तो तात्काळ लागू करावा.
संघटनेचे म्हणणे आहे की, या मागण्यांबाबत अनेक वेळा व्यवस्थापनाला कळवूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगार वर्गात प्रचंड असंतोष पसरला आहे.
संघटनेने पुढे इशारा दिला आहे की, “वरील मागण्या पुढील २१ दिवसांत पूर्ण न झाल्यास नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय व सफाई कर्मचारी लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन सुरू करतील. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटल प्रशासन व शासनावर राहील.”
माहितीस्तव या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सरकारी कामगार अधिकारी आणि बदनापूर पोलीस निरीक्षक यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे.
कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.




















