भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणे बंद झाले असून गेले कित्येक दिवस प्रयत्न करून फडणवीस यांची साधी भेट देखील होऊ शकत नसल्याने अस्वस्थ झालेले संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
संजय क्षीरसागर हे मोहोळमधील धनगर नेते असून त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसला आहे तर माढ्यात ( शरद पवारांचं बळ वाढलं आहे.तरुण वयात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी , गोपीनाथ मुंढे अशा नेत्यांच्या विचाराने भारावून काम केलेल्या संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रोपटे लावले, त्याला मोठे केले. मात्र पक्षातील दोन नेत्यांनी फडणवीस यांचे कान भरल्याने त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत भावनिक झालेल्या संजय क्षीरसागर यांनी आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले. गेली 26 वर्षे ज्या पक्षासाठी एक एक कार्यकर्ता जोडून मोठी व्होट बँक तयार केली तोच पक्ष सोडून जाताना संजय क्षीरसागर यांचे डोळे पाणावले होते.