सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रविरोधी शक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करू न देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ऍड. क्षितिज गायकवाड यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद शाखा सोलापूर, समरसता गतिविधि सोलापूर आणि विवेक विचार मंच सोलापूर यांच्यातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ‘शोध बाबासाहेबांचा’ या विषयावरील जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवस्मारक सभागृहात ऍड क्षितीज गायकवाड यांनी सोलापूरकरांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड. धनंजय माने, शहर अध्यक्ष ऍड. महेश अग्रवाल, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण उपस्थित होत्या.
ऍड. क्षितिज गायकवाड म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू समाजातील हिरा होते. दुर्दैवाने त्यांचे महत्त्व हिंदू समाजाला कळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू विरोधी ठरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांची सत्य बाजू कधीही पुसली जाणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांचा मार्ग समाजाला दाखविला तो भारतीयांच्या फायद्याचा आहे. प्रत्येकाच्या श्रद्धा आणि मतांचा आदर करत त्या श्रद्धेचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देत संविधानाला मानणारा आदर्श नागरिक तयार करण्याची आपली भूमिका असली पाहिजे.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान देशभक्त होते, असेही ऍड. क्षितिज गायकवाड याप्रसंगी म्हणाले.
भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेचे वाचन ऍड. परमानंद जवळकोटे यांनी केले. अधिवक्ता परिषदेचे प्रांत संघटन सचिव ऍड. लक्ष्मीकांत गवई यांनी प्रास्ताविक केले. ऍड. वैशाली महिंद्रकर यांनी सूत्रसंचालन तर रंगनाथजी बंकापूर यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी अधिवक्ता परिषदेच्या प्रांत सदस्या ऍड. नीता मंकणी, विवेक विचार मंचाचे शहर संयोजक सिद्धांत बाबरे, जिल्हा सहसंयोजक ॲड. प्रशांत कांबळे, अधिवक्ता परिषदेचे सचिव ऍड. शांतिवीर महिंद्रकर, समरसता गतीविधीचे जिल्हा सहसंयोजक अंबादास खराडे आदी उपस्थित होते.
———-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी कटिबद्ध राहू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांना अधिकार मिळाले. त्याबद्दल संपूर्ण देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऋणी आहे. हिंदू धर्माच्या काही परंपरांमध्ये सुधारणा करण्याचे महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण कटीबद्ध असले पाहिजे, असे सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी सांगितले.

























