करमाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजे येथील विद्यार्थिनी कु. अन्वी संजय गर्ने हिने नुकत्याच माढा येथे पार पडलेल्या “टॅलेंट हंट” जिल्हास्तरीय वक्तृत्व लहान गट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे, गावाचे तसेच संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभागघेतला होता.
अत्यंत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, स्पष्ट उच्चारशैली, प्रभावी विचारमांडणी आणि विषयावरील सखोल जाण या गुणांच्या जोरावर अन्वीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या वक्तृत्वातील नैसर्गिक ओघवतेपणा आणि विचारातील परिपक्वता यामुळेच तिला प्रथम क्रमांक मिळाला.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अमोल राऊत, वर्गशिक्षक गणेश गरड, तसेच सहशिक्षक नामदेव घोगरे, शिवलाल शिंदे, माधुरी कांबळे यांनी अन्वीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेच्या शिक्षकवृंदाने तिचा सत्कार करून तिच्या यशाचा आनंद व्यक्त केला. वैशाली रासकर, आणि तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौदागर सरडे, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच गणेश सरडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही अन्वीचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख संजय मुंढे, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांनीही अन्वीचे कौतुक केले. तिच्या या यशामागे पालक संजय गर्ने आणि गर्ने यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असल्याचे सर्वांनी नमूद केले. कु. अन्वी संजय गर्जेचे हे यश म्हणजे करंजे गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून, तिच्या वक्तृत्व कौशल्यामुळे भविष्यात ती मोठ्या पातळीवर नाव कमावेल असा विश्वास सर्व शिक्षकवर्ग आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.






















