मालदिव्समध्ये सत्ताबदल होताच भारतविरोधी सूर उमटू लागले. पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात मालदिव्सच्या मंत्र्यांनी भारताविरोधात केलेली विधानं पाहता त्यातून भारताबद्दलचा द्वेष अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या विधानांमुळे द्विपक्षीय संबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे. भारतीयांनी बॉयकॉट मालदिव्स म्हणत पर्यटनाच्या योजना रद्द केल्या आहेत. याचा फटका आगामी दिवसांमध्ये मालदिव्सला बसेल. मालदिव्सला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे.
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्विप दौऱ्यानंतर मालदिव्सची चर्चा सुरू झाली. अनेकांनी दोन्ही ठिकाणींची तुलना केली. ती मालदिव्सच्या मंत्र्यांनी रुचली नाही. त्यांच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतावर टीकेची झोड उठवली. यामुळे भारतीय खवळले आणि बॉयकॉट मालदिव्स ट्रेंडमध्ये आला. भारतीयांचा रोष पाहता तीन मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यानंतर आता मालदिव्सच्या माजी डेप्युटी स्पीकर इवा अब्दुल्ला यांनी ठाम भूमिका घेतली आहे. मालदिव सरकारनं भारत आणि तिथल्या नागरिकांची माफी मागावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
इवा अब्दुल्ला इब्राहिम सोलेह यांच्या सरकारमध्ये मालदिव्सच्या डेप्युटी स्पीकर होत्या. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाणार होता. मात्र त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. आता त्या खासदार आहेत. माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्या त्या चुलत भगिनी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसोबत त्यांनी काम केलं आहे. स्थानिक वृत्तपत्र मिनीव्हॅन डेलीच्या व्यवस्थापिका म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २००९ पासून त्या सलग तीनवेळा गालोल्हू उथरु मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकल्या आहेत.
मे २०२३ मध्ये त्यांनी पक्ष सोडला. त्या मालदिवीयन डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य होत्या. आता त्या मोहम्मद नशीद यांच्या नेतृत्त्वाखाली द डेमोक्रॅट्सच्या सदस्या आहेत. इवा ७६ खासदारांच्या पाठिंब्यानं २०१९ मध्ये डेप्युटी स्पीकरपदी निवडून गेल्या. या पदावर निवडून गेलेल्या त्या दुसऱ्या महिला सदस्य आहेत. त्याआधी २००८ मध्ये अनीसा अहमद या पदावर विराजमान झाल्या होत्या
इवा यांचं शिक्षण परदेशात झालं आहे. केंट विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. वार्विक विद्यापीठातून राजकारण आणि सरकार विषयात बीए आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एमए केलं. मुइज्जू सरकारमधील मंत्र्यांनी मोदींविरोधात केलेल्या विधानांबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. ‘त्या ३ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याची मला कल्पना आहे. पण मालदिव्स सरकारनं भारत आणि तिथल्या नागरिकांची माफी मागायला हवी असं मला वाटतं. मंत्र्यांनी केलेली विधानं लज्जास्पद आहेत. आपण भारतावर किती अवलंबून आहोत याची आपल्याला जाणीव आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भारत आपल्यासोबत राहिला आहे,’ असं त्या म्हणाल्या.