अंबड / जालना – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सल्लागार समितीच्या सदस्यपदी श्री. भानुदास दोबाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांच्या मान्यतेने करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
श्री. भानुदास दोबाले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच युवक प्रबोधनाच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी मार्गदर्शन, समाजोपयोगी उपक्रम, स्वयंसेवी चळवळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती सन 2025–26 व 2026–27 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांना त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, सिनेट सदस्य प्रा. नाना गोडबोले, डॉ. विठ्ठल राजकर, मा. सरपंच शिवाजी बामणे, आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक माऊली दोबाले, योगेश हेंद्रे, जालिंदर चोरमले, संतोष काकडे, अमर शिंदे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. भानुदास दोबाले यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

























