देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. देगलूर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांसाठी निवडणुका लवकरच होणार या आशेने इच्छुक उमेदवारांमध्ये जनसंपर्काची जणू स्पर्धाच लागली होती. परंतु निवडणूका लांबणीवर गेल्याने गाठीभेटींना तुर्तास तरी फुलस्टॉप लागला.
देगलूर तालुक्यातील खानापूर, शहापूर, करडखेड, मरखेल आणि हाणेगाव असे पाच जिल्हापरिषद सर्कल तसेच खानापूर,वन्नाळी, शहापूर, तमलूर, करडखेड, वळग, मरखेल, बेम्बरा, हाणेगाव आणि वझर या दहा पंचायत समितीच्या निवडणुका होणार होत्या पण आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्याच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाली. इच्छुक उमेदवारांनी मागील चार-पाच महिन्यापासून गावोगावी भेटीगाठी, कार्यक्रमांना उपस्थिती, मतदारांशी थेट संवाद अशा माध्यमातून उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली होती. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने याचा थेट परिणाम इच्छुक उमेदवारांच्या हालचालींवर झाला आहे.
निवडणुका लांबणीवर गेल्याने आता उमेदवारांमध्ये ‘पुढेही निवडणुका लांबतील का?’ अशी भीती व धास्ती निर्माण झाली आहे. जे उमेदवार आतापर्यंत प्रचारासाठी गावोगावी धावपळ करत होते, त्यांनी तूर्तास तरी प्रचार यंत्रणेला व जनतेच्या भेटीगाठींना फुल स्टॉप दिल्याचे चित्र दिसून येत आहे. “निवडणुका अजून दूर असताना इतकी धावपळ कशासाठी?” असा सवाल काही इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे. तर केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच जनतेच्या भेटीगाठी घ्यायच्या का, की सातत्याने लोकांसोबत राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. दरम्यान, निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे विविध पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवार सध्या पूर्णपणे ‘गायब’ झाल्याचे चित्रही तालुक्यात पाहावयास मिळत आहे. एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनिश्चिततेमुळे देगलूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या प्रतीक्षेच्या व संभ्रमाच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट होत आहे.


























