महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करत नुकतेच भाजपवासी झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. मात्र काँग्रेस पक्षाला असे राजकीय भूकंपाचे हादरे देणारे अशोक चव्हाण हे काही एकमेव माजी मुख्यमंत्री नाहीत, तर काँग्रेस सोडणारे ते १३ वे मुख्यमंत्री आहेत. गेल्या १० वर्षांत काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर १३ माजी मुख्यमंत्र्यांनी विशिष्ट कारणांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे.
काँग्रेस सोडणाऱ्यांमध्ये अमरिंदर सिंग (पंजाब), गुलाम नबी आझाद (जम्मू आणि काश्मीर), विजय बहुगुणा (उत्तराखंड), दिवंगत अजित जोगी (छत्तीसगड), एस.एम. कृष्णा (कर्नाटक), नारायण राणे (महाराष्ट्र), किरण कुमार रेड्डी (आंध्र), पेमा खांडू (अरुणाचल) आणि गिरीधर गमांग (ओडिशा) (गमंग नुकतेच पार्टीत परतलेत.) गोव्यातील तीन (लुझिन्हो फालेरो, दिगंबर कामत, रवी नाईक) या सगळ्यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती धरले आहे.
यापैकी बहुतेकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटनेची पिछेहाट झाली, असे आरोप करूनच काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती धरले आहे. यापैकी सगळे नेते राज्यांचे मुख्यमंत्री तर राहिलेच होते, पण त्याचबरोबर राज्यांमधील काँग्रेस संघटना देखील काही काळ त्यांच्या नियंत्रणाखाली होती. वर उल्लेख केलेल्या नेत्यांचाही प्रभाव कमी होत गेला. स्वतःच्या प्रभावातून ते आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेस संघटना मजबूत ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपचे कमळ हाती धरण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.