सोलापूर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग लावून निवडणूक लढवण्यासाठी तयार सुरू केलेली दिसत आहे. शहराच्या हद्दवाढ भागातील कुमठा नाका, हुच्चेश्वर मठ, सोलगी नगर, म्हेत्रे नगर या परिसरात विकास कामांचा धडाका सुरू केलेल्याचे दिसत आहे. स्थानिक नगरसेवकांनी प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याने इच्छुकांनी येथे बॅनरबाजी करत विविध रस्त्यांच्या मंजुरीचे फलक लावलेले दिसत आहेत.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल आहे. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणूकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रत्यक्षात कामास सुरुवात केलेली दिसत आहे. हद्दवाढ भागातील विविध नगरात विकास कामांचा धडाका लावला असून, कामाचे पोस्टर लावलेले दिसत आहेत. वर्षानुवर्षे रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचे कार्य इच्छुकांकडून केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील म्हेत्रे नगर ते म्हेत्रे वस्ती येथे रस्त्यांच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे पोस्टर झळकावण्यात आल्याने प्रभागाच्या माजी नगरसेवकांचे भुवया उंचावलेल्या दिसत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्याला सहकार्य करावे अशी भावना ठेवून अनेक इच्छुक गेल्या काही दिवसांपासून प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यातूनच ज्या ठिकाणी रस्ते नाहीत अशा ठिकाणी रस्ते बनवण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी मूलभूत सोई सुविधा नाहीत. तेथे नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी इच्छुक कार्यरत असल्याचे दिसत आहेत. इच्छुकांच्या धावपळीमुळे आजी-माजी नगरसेवकांमध्ये चलबिचल वातावरण दिसत आहे.



















