सोलापूर : उच्च गुणवत्तेचे कॅमशँप्ट बनवून जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या प्रिसिजन उद्योग समूहाने पुढील वर्षी जूनपासून सोलापुरातच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेला आणखी एक नवा असेंबल कँमशँप्ट प्रकल्प
चिंचोली येथील औद्योगिक वसाहतीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे रोजगाराची संधी मिळणार आहे.
या उद्योग समुहाचे चेअरमन यतीन शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या नव्या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले, चिंचोली येथील औद्योगिक वसाहतीत हा नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी पुर्वतयारी झाली आहे. असेंबल कँमशँप्ट उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उत्पादनाला जगातील बाजारपेठेत मोठी मागणी असून काहींनी आमच्याकडे आँर्डरही दिली आहे. एक दीड वर्षात आम्ही दरमहा एक लाख असेंबल कँमशँप्टचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक करणार आहोत. या नव्या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही शहा यांनी सांगितले.
प्रिसिजन कँमशँप्टची निर्यात सध्या अनेक देशात होते. या उद्योगाचा विदेशात विस्तारदेखील झाला आहे. परंतु या पुढच्या काळात भारतातच आपल्या कंपनीचा विस्तार करण्यात येईल असा मानसदेखील यतीन शहा यांनी बोलून दाखवला. गेल्या अनेक वर्षापासून मी उद्योग विस्ताराच्या निमित्ताने जगभर फिरत असतो. अनेक देश फिरुन आलो आहे. पण तिकडे काम करण्यात खुप कायदेशीर अडचणी आहेत. त्यापेक्षा भारतात काम करणे सोपे आहे, असे शहा म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या धोरणाचे पडसाद जगभर उमटत असले तरी परिणाम जाणवायला आणखी सहा आठ महिने लागतील. कारण भारताचा विचार केला तर विकास दर वाढला आहे. निर्यातीदेखील वाढली आहे. त्यामुळे काही दिवस तरी वेट अँड वॉची भूमिका असली पाहिजे, असेही यतिन शहा यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने जीएसटी कमी केला याचा वाहन विक्रीवर परिणाम झाला असल्याचा इन्कार करताना ते म्हणाले, जीएसटी कमी होणार आहे हे लोकांना आधीच माहीत होते. त्यामुळे लोकांनी गाड्यांची खरेदी लांबणीवर टाकली. जीएसटीचे नवे दर येण्यापूर्वी वाहन विक्री कमी झाली होती. आता ती वाढल्यासारखी दिसते. परंतु गेल्या दोन महिन्यातील सरासरी विक्री पाहिली तर जीएसटीमुळे फार फरक पडल्याचे दिसत नाही असे शहा म्हणाले.
सोलापुरातील संभाव्य आयटी पार्क बाबत बोलताना ते म्हणाले, विमानसेवा सुरु झाली त्यामुळे वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी काही गोष्टी कराव्या लागतील. त्या आधी केल्या पाहिजेत. त्यामुळे आधी आयटी पार्क की आधी वातावरण निर्मिती याचा विचार झाला पाहिजे. आणि ते कोण करणार या प्रश्नाचेही उत्तर मिळाले पाहिजे. हळूहळू या सर्व गोष्टी होतील, असेही शहा यांनी सांगितले.
जगातील युध्दजन्य परिस्थितीमुळे नवी शक्ती पुढे येतेय
जगातील युध्दजन्य परिस्थितीचे पडसाद उमटत आहेत. काही नवे पॉवर सेंटर पुढे येत आहेत. पूर्वी अमेरिका, रशिया यासारख्या मोठ्या देशांकडे पाँवर सेंटर म्हणून पाहिले जात होते. आता नव्या देशांची नावे पुढे येत आहेत. त्यांचे महत्त्व अचानक वाढले आहे, असेही शहा म्हणाले.
इथले वातावरण पाहून नंतर उद्योजक गुंतवणुकीचा विचार करू शकतील.
सोलापुरात विमानसेवा सुरू झाली याचा आनंद व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, विमानसेवा सुरु झाली म्हणजे एका रात्रीतून सगळे काही होईल असे नाही. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. देशातील चांगल्या उद्योजकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. विमानसेवा सुरु झाल्याची माहिती मिळाली तर ते सोलापुरात येतील. इथले वातावरण पाहून नंतर गुंतवणुकीचा विचार करू शकतील. चांगले वातावरण निर्माण झाले पाहिजे.



















