अक्कलकोट – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, चालू वर्षाच्या करासह थकबाकीची निम्मे रक्कम एकाच वेळी ३१ डिसेंबर पर्यंत भरल्यास ५० टक्के सवलत मिळणार असल्याने गोगाव ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी घरपट्टी भरून सवलतीचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन गोगांव सरपंच वनिता सुरवसे यांनी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गोगांव ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करामध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ही सवलत फक्त अभियान कालावधीत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. योजनेनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत दिली जाईल.
नागरिकांना चालू २०२५-२६ या वर्षाचा पूर्ण कर एकरकमी भरावा लागणार आहे. तसेच १ एप्रिलपूर्वीची थकबाकी वर ५० टक्के सवलत लागू होईल. मात्र, थकबाकीवरील सवलतीची उर्वरित रक्कमही एकरकमीच भरावी लागणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. या योजनेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी थकबाकी व चालू वर्षाचा कर भरून सवलतीचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अधिकारी विक्रम घाटे यांच्याशी संपर्क साधावे असे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले आहे.

























