करकंब : मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी.या सणामागे धार्मिक महत्त्व आहेच पण वैज्ञानिक बाजूही आहे.भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असाआहे.या काळात हंगामानुसार विविध प्रकारच्या भाज्या येतात त्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते जी भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते.ती तीळ लावलेल्या बाजरीचा भाकरी सोबत खाल्ली जाते.
या अनुषंगानेच प्रतिवर्षाप्रमाणे भोगी व मकर संक्रांतीच्या सणानिमित्त करकंब ता.पंढरपूर येथील श्री.चौंडेश्वरीदेवी मंदिरामध्ये संजीवकुमार म्हेत्रे व परिवार,कोष्टीसमाज भगिनींकडून श्री.चौडेश्वरी मातेला ६० प्रकारच्या भाज्या,फळभाज्या व फळे यांची सुंदर व आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.यावेळी उपस्थित कोष्टी समाजातील पुरुष व महिला भगिनींनी चौंडेश्वरी माता की जय,शाकंभरी माता की जय,तुळस कोट बदामीचे टाळ वाजे शंभर कोट म्हणत श्री.चौंडेश्वरीमातेचा जयजयकार केला.यावेळी कोष्टी समाजातील समाज बांधव,भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
भोगी सण शेतात आलेल्या नवीन पिकांसाठी भगवान इंद्रांचा आशीर्वाद मानून साजरा केला जातो.इंद्रदेवांनी धरतीवर पिके,धनधान्याची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.वर्षभर पिकांची भरभराट व्हावी म्हणून हा सण साजरा केला जातो.भोगी हा सण फक्त महाराष्ट्रातच मर्यादित नाही तर देशभरात वेगवेगळ्या नावांनी आणि स्थानिक परंपरेनुसार साजरा केला जातो.
भोगीच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी ही केवळ परंपरेसाठी नाहीतर आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. हंगामी भाज्या आणि डाळी एकत्र करून बनवलेली ही भाजी शरीराला आवश्यक पोषण देते.हिवाळ्यात शरीरात निर्माण होणारा कफ कमी होतो,पचनशक्ती सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.भोगीच्या दिवशी हंगामी भाज्यांची सेवन न करणारी व्यक्ती आरोग्यासाठी उपयुक्त गोष्टींपासून वंचित राहते असे मानले जाते.जो न खायेगा भोगी वह सदा रहेगा रोगी अशी म्हणही आपल्यामध्ये प्रचलित आहे.
























