सोलापूर – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर माहेरवाशीण महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन आपल्या माहेरी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकात एकच गर्दी केल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. लक्ष्मीपूजनानंतर अनेक महिलांनी भाऊबीज साजरी करण्यासाठी आपले माहेर गाठले. तर काही कारणास्तव भाऊबीज यादिवशी न जाऊ शकलेल्या महिलांनी शनिवारी बसस्थानक परिसरात माहेरी जाण्यास फलाटावर गर्दी केलेली दिसून आले.
दरम्यान, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, सोलापूर एसटी विभागाने देखील विविध मार्गावर ज्यादा बससेवा पुरविली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच जिल्ह्यातील विविध अकरा तालुक्यांना जोडणाऱ्या बसेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त महिलांचा तसेच आबालवृद्धांचा प्रवासाकडे ओढा असतो. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध मार्गावर बसेसच्या जादा फेऱ्या सोडल्या जातात. एसटी महामंडळाच्या बसेस विविध मार्गावर धावत असल्याने एसटी महामंडळाचे चक्र वेगाने फिरत आहे. त्यामधून एसटी महामंडळादेखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. दिवाळी आणि उन्हाळी अशा दोन स्वरूपातील हंगामी एसटी भाडेवाढ केल्याने एसटीच्या तिजोरीत लाखोंचे उत्पन्न पडत आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी सोलापूर बस स्थानकावर दिसून येत आहे. एसटी बसेसच्या ज्यादा फेऱ्यांचे नियोजन करून देखील एसटी बसेसची संख्या कमी पडत असल्याने प्रवासी तासंतास ताटकळत फलाटावर उभे असल्याचे दिसून आले.
एसटी महामंडळाच्या प्रवास सुरक्षित प्रवास मानला जात असल्याने, रोशन मधून एसटी बसेसला प्रथम प्राधान्य दिले जाते. नव्या पद्धतीच्या एसटी बसेस ताफ्यात रुजू झाल्याने प्रवाशांचा प्रवास हा आरामदायक होत आहे.
पावसामुळे सर्वत्र दुर्गंधीचे आणि अस्वच्छतेचे वातावरण
सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस जोरदार कोसळला. या पावसामुळे एसटी स्टँडच्या आवारात पाणी साचल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले. याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
फोटो ओळ – दिवाळी सणाच्या सुट्ट्यानिमित्त परगावी जाण्यासाठी प्रवाशांची सोलापूर बसस्थानकावर वाढलेली गर्दी दिसत आहे.




















